‘बेस्ट’ला पालिकेची 400 कोटींची मदत

363
bmc

आर्थिक संकटात असलेल्या ‘बेस्ट’ला पालिकेने पुन्हा 400 कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सोमवारी पालिकेच्या महासभेत अंतिम मंजुरी देण्यात आली. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे पालिकेने आतापर्यंत ‘बेस्ट’ला सुमारे 17 कोटींची मदत केली असून आता आणखी 400 कोटी रुपये दिल्याने परिवहन विभाग ‘रुळा’वर येण्यास मदत होणार आहे.

रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमावर अडीच हजार कोटींचा कर्जाचा डोंगर होता. त्यामुळे ‘बेस्ट’ला काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱयांचा पगार देणेही मुष्कील झाले होते. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या ‘बेस्ट’ला कर्जमुक्त करण्यासाठी पालिकेकडून 2100 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आतापर्यंत 1700 कोटींची रक्कम पालिकेने ‘बेस्ट’ला दिली आहे तर उर्वरित 400 कोटींची रक्कम देण्यासाठी सप्टेंबरमध्येच स्थायी समितीने मंजुरी दिली होती, मात्र या प्रस्तावाला महासभेची अंतिम मंजुरी मिळाली नव्हती. या पार्श्वभूमीवर 400 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी प्रस्तावावर मत मांडताना ‘बेस्ट’ला आर्थिक मदत करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले.

 पालिकेने ‘बेस्ट’ला अशी केली मदत

‘बेस्ट’ उपक्रमाला महानगरपालिकेने 2014-15 मध्ये 150 कोटी, 2015-16 मध्ये सानुग्रह अनुदान देण्यासाठी 25 कोटी, 2016-17 मध्ये नवीन बस खरेदीसाठी 100 कोटी तर बोनससाठी 21.64 कोटी रुपये, 2017-18 मध्ये 13.69 कोटी, 2018-19 मध्ये 14.56 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे तर 2019-20 मध्ये अर्थसंकल्पात दिव्यांगांना सवलत, कर्मचाऱयांच्या वसाहतींची दुरुस्ती, आयटीएमएस प्रोजेक्ट, ईआरपी सोल्युशन्स, पारंपरिक दिवे एलईडी दिव्यांमध्ये रूपांतरित करणे इत्यादींसाठी 139.20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘बेस्ट’ला पालिकेने जून महिन्यात 600 कोटी रुपये आणि ऑगस्ट महिन्यात 1136.39 कोटी रुपये दिले आहेत.

कारभार सुधारा

‘बेस्ट’चा आर्थिक डोलारा सुधारण्यासाठी पालिका कोटय़वधीची मदत करीत आहे. तरीदेखील या वर्षी ‘बेस्ट’ प्रशासनाने बावीसशे कोटींहून जास्त तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावरून ‘बेस्ट’ला मदत करूनही  प्रशासन आपला कारभार सुधारत नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले. त्यामुळे आता तरी ‘बेस्ट’ने कारभार सुधारावा, अन्यथा मदत देण्याबाबत वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला, तर पालिकेने दिलेल्या कोटय़वधी रुपयांचा विनियोग ‘बेस्ट’ने कसा केला याचे उत्तर द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. पालिकेने केलेली मदत कोणकोणत्या कारणासाठी वापरली याचे उत्तर ‘बेस्ट’ने द्यावे अशी मागणी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या