बेस्टला टाटाची ‘पॉवर’,  पाच वर्षांसाठी 676 मेगावॅट वीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मुंबई शहरातील सुमारे दहा लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणार्‍या बेस्टला टाटा पॉवरची ‘पॉवर’ मिळाली आहे. बेस्ट आणि टाटा पॉवरमधील वीज खरेदी करार संपत असल्याने खुल्या निविदा मागवून कमी दर असलेल्या वीज कंपनीकडून वीज खरेदी करण्याचे आदेश महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने बेस्टला दिले होते. त्यानुसार टाटा पॉवरने प्रतियुनिट 4 रुपये 63 पैसे दराने बेस्टला तब्बल 676 मेगावॅट वीज देण्याची तयारी दर्शवली होती. त्यास वीज आयोगाने आज मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी वीज घेण्याचा बेस्टचा मार्ग मोकळा झाला आहे.

बेस्टकडून मुंबई शहरात दररोज जवळपास 750 ते 800 मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत ही वीज टाटा पॉवरकडून घेतली जात होती, मात्र त्याचा वीज खरेदी करार 1 एप्रिल रोजी संपत असल्याने बेस्टने वीज खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार टाटा पॉवरबरोबरच महावितरण, धारीवाल, साई वर्धा या वीज कंपन्यांनी वीज पुरवठ्याची तयारी दर्शवली होती. मात्र मुंबईबाहेरून वीज आणण्यावर येणार्‍या मर्यादा आणि मुंबईला करावा लागणार्‍या सातत्यपूर्ण वीजपुरवठ्याचा विचार करत बेस्टने टाटा पॉवरकडून 676 मेगावॅट वीज घेतली. त्याच्या वीज खरेदी कराराला आज वीज आयोगाने मंजुरी दिल्याने बेस्टपुढील विजेचा प्रश्न मिटला आहे. खोपोली येथील जलविद्युत प्रकल्प आणि ट्रॉम्बे येथील औष्णिक वीज प्रकल्पातून सदर वीज पुरवली जाणार आहे.

साई वर्धा वीज कंपनीकडून 100 मेगावॅट

टाटाबरोबरच बेस्टला साई वर्धा या वीज कंपनीकडून 100 मेगावॅट वीज मिळणार आहे. या विजेच्या प्रतियुनिटचा दर 3 रुपये 94 पैसे एवढा आहे. बेस्टला टाटाच्या तुलनेत साई वर्धाकडून कमी दराने वीज मिळल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.