भारत जोडो न्याय यात्रेचे मुंबईत जोरदार स्वागत

भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने काँग्रेस  नेते आणि खासदार राहुल गांधी आज मुंबईत दाखल झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या यात्रेची सांगता चैत्यभूमी येथे झाली. यावेळी मुंबई काँग्रेस तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वतीने राहुल गांधी यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले.

राहुल गांधी मुंबईत दाखल होण्यापूर्वी ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुलुंडमार्गे घाटकोपरहून धारावीमार्गे ही यात्रा दादर येथील शिवसेना भवन आणि त्यानंतर चैत्यभूमी येथे आली. यावेळी त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून या यात्रेची सांगता केली. या यात्रेदरम्यान मुंबईसह महाराष्ट्रातील काँग्रेसमधील सर्व ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उपस्थित होत्या.

धारावी येथे भव्य रांगोळी तयार करण्यात आली होती. त्याशिवाय धारावीत राहुल गांधी यांच्या चेहऱयांचे मुखवटे घालून कार्यकर्ते उपस्थित होते. त्याशिवाय या संपूर्ण परिसरात फटाक्यांची आतषबाजी, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा आणि पेंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

मुंबईत आज पदयात्रा

राहुल गांधी उद्या, रविवारी सकाळी मुंबईत पदयात्रा काढणार आहेत. महात्मा गांधींचे ज्या मणिभवनमध्ये वास्तव्य होते त्या मणिभवनपासून ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत राहुल गांधींचीही पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेला ‘न्याय संकल्प पदयात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. सकाळी साडेआठ वाजता ही पदयात्रा सुरू होईल. यात मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.