तब्बल 21 तासानंतर अथक प्रयत्नांनी भारत संचार निगमची संगमेश्वर तालुक्यातील सेवा पूर्ववत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भारत संचार निगमच्या फायबर केबल तुटून सेवा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. संगमेश्वर तालुक्यात शनिवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भारत संचार निगमची सेवा खंडीत झाली होती. अपूरा कर्मचारी वर्ग , साधनांचा अभाव , पावसाळी वातावरण यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत होते. या सर्वांवर मात करत रविवारी दुपारी फायबर केबल अथक प्रयत्नांनी पूर्ववत करण्यात भारत संचार निगमला यश आले आहे. त्यामुळे सुमारे 21 तासानंतर संगमेश्वर तालुक्यातील भारत संचार निगमची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.

संगमेश्वरजवळ सोनगिरी गावाच्या आसपास महामार्गालगत चौपदरीकरणाच्या कामामुळे शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भारत संचार निगमची फायबर केबल तुटली होती. यामुळे संगमेश्वर तालुक्यातील भारत संचारची मोबाईल टॉवर आणि इंटरनेट सेवा खंडीत झाली होती. रविवारी सकाळपर्यंत सेवा सुरळीत झाली नसल्याने भारत संचारचे ग्राहक त्रस्त होते. शिनिवारी सायंकाळी फायबर केबल तुटल्यानंतर तासाभरात केबल जोडणारी टीम सोनगिरी येथे गेली होती. मात्र, सलग दोन तास पावसाची संततधार कायम राहील्याने काम हाती घेणे आणि पूर्ण करणे शक्य झाले नाही, अशी माहिती भारत संचारचे अभियंते अविनाश पाटील यांनी दिली.

केबल नेमकी कोणत्या ठिकाणी तुटली आहे, हे स्पष्ट झाले असले तरी महामार्गाचे काम सुरू असल्याने मातीचा मोठा ढिगारा त्याठिकाणी होता. त्यामुळे कामात अडथळे येत होते. रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून अथक प्रयत्न केल्यानंतर दुपारी 2 वाजता म्हणजे जवळपास 21 तासांनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात यश मिळाले. महामार्गालगत फायबर केबल असल्याने चौपदरीकरणाच्या कामामुळे केबल वारंवार तुटून सेवेत खंडीत होत असल्याचे भारत संचार निगमतर्फे सांगण्यात आले आहे.