
सामना प्रतिनिधी। बीड
शहरातील शिवाजीनगर ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या कालिदास हरिदास पोकळे (३५) यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सर्कस ग्राऊंड परिसरात मंगळवारी रात्री नऊ वाजता ही घटना उघडकीस आली.
कालिदास पोकळे हे मुळचे चांदेगाव (ता.बीड) येथील रहिवाशी आहेत. पंधरा वर्षापूर्वी ते पोलीस दलात दाखल झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत होते. दोन महिन्यांपासून ते आजारी होते. मंगळवारी घरातील लोखंडी अँगलला उपरण्याने गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. यावेळी घरातही कोणी नव्हते. त्यामुळे हा प्रकार लवकर उघडकीस आला नाही. दरम्यान रात्री आठ वाजता त्यांचा पुतण्या जेवणाचा डब्बा घेवून आला. त्यावेळी त्याने दरवाजा ढकलला असता कालिदास पोकळे यांचा लटकलेला मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी उपाधिक्षक सुधीर खिरडकर, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी भेट दिली. चित्रीकरणात पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला. कालिदास पोकळे यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.






























































