
प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे सध्या देशात वातावरण तापले आहे. आता या वादात भीम सेनेनेही उडी घेतली आहे. भीम सेनेचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी बुधवारी नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच कानपूर हिंसाचाराची सूत्रधार देखील नुपूर शर्माच असल्याचा आरोप भीम सेनेने केला आहे.
भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी आरोप केला आहे की नुपूर शर्मा यांनी पैगंबराचा अपमान केला आहे, ज्यामुळे करोडो मुस्लिम दुखावले गेले आहेत. मोदी सरकार जाणूनबुजून नुपूर शर्माला अटक करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नुपूर शर्मा ही कानपूर दंगलीची खरी सूत्रधार आहे, मग योगी सरकारने त्यांना अटक का केले नाही, असा प्रश्न तंवर यांनी योगी सरकारवर उपस्थित केला.
सतपाल तंवर म्हणाले की, नुपूर शर्मासारख्या राजकारण्यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ तुरुंगात पाठवावे किंवा देशाबाहेर हाकलून द्यावे. नुपूर शर्मा यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जगभर भारताची बदनामी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. चौफेर दबावानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. अनेक कट्टरवादी नुपूर शर्मा यांना धमक्याही देत आहेत. हा धोका पाहता दिल्ली पोलिसांनी नुपूर यांना सुरक्षा पुरवली आहे.

























































