भीमा-कोरेगाव दंगल : नक्षलवाद्यांशी थेट संबंधाचे पुरावे, पाच जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । नागपूर

‘संविधान, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्याच विचारावर हे सरकार चालेल असा विश्वास देत भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांचे नक्षलवाद्यांशी थेट संबंध आल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत, त्यावर पुढील तपास सुरू आहे. तसेच भीडे गुरूजी यांनी केलेल्या वक्तव्याची तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

भीमा-कोरेगाव येथे पुजा सकट हिच्या मृत्यू प्रकरणी आणि भीमा-कोरेगाव दंगलीच्या चौकशीसंदर्भात आमदार जयदेव गायकवाड, शरद रणपिसे यांनी प्रश्न विचारला होता. ‘भीडे गुरूजी हे वारंवार संविधान विरोधी वक्तव्य करत आहेत, त्यांना अटक कधी करणार?, सरकार भीडेंना वाचविण्यासाठी नक्षलवाद्यांचा संबंध जोडत आहे यावरून विरोधी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नक्षलवाद्यांचा संबंध आल्याने पाच जणांना अटक केली आहे, हा तपास कुठपर्यंत आला आहे, आरोपपत्र दाखल कधी होणार असा प्रश्न केला. कपील पाटील यांनी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत अटक केलेल्यां पाच जणांच्या अटकेचा पुर्नविचार करणार का असे विचारले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पुजा सकट हिचा खून झालेला नसून विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोघांना अटक केली आहे. तसेच भीडे गुरूजी असो की अन्य कोणालाही क्लीनचिट देणार नाही. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’

तसेच, ‘नक्षलवाद्यांचा संबंध आल्याने अटक केलेल्यांचे अनेक वेगवेगळे पुरावे सापडले आहेत. त्यांच्यावर आरोपरोपत्र दाखल केले जाईल. न्यायालयीन चौकशी आयोगाची मुदतवाढ करून १६ जुलैपर्यंत केली आहे. मागणी झाल्यास ती वाढवली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभ आणि वढू येथील छत्रपती संभीज महाराज समाथीच्या विकासासाठी त्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.