
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. भोकरहून उमरीकडे जात असलेल्या एका चार चाकी गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी नदीत कोसळली होती. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नात्यातल्या मुलीचा वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून परतत असताना ही दुर्घटना झाली आहे. गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे कळते आहे.
सविता श्याम भालेराव (30),प्रिती परमेश्वर भालेराव (8) रा.रेणापूर ता.भोकर आणि सुशील मारोती गायकवाड (9) रा.रामखडक ता.उमरी या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. रेखाबाई परमेश्वर भालेराव(30),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(28) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृत व्यक्ती आणि जखमी व्यक्ती या सगळ्या एकाच कुटुंबातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या महिला या सख्ख्या जावा आहेत.
























































