
सामना ऑनलाईन। भोपाळ
मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागलीय सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस पक्षातील सोशल मीडियावरील “वॉर” अधिकच पेटू लागले आहे. सध्या काँग्रेसचे मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात कमलनाथ म्हणतात ,कुणी म्हणते त्याच्यावर चार गुन्हेगारी केसेस दाखल आहेत. त्याला पक्ष उमेदवारी कशी देऊ शकतो.पण मीटर म्हणतो एखाद्यावर पाच गुन्हेगारी केसेस का दाखल असेनात, आम्हाला विधानसभा मतदारसंघात हमखास जिंकणारा उमेदवार हवाय.
कमलनाथ यांच्या या व्हिडिओला आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शेअर करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस का हाथ ,अपराध के साथ ,असे लिहीत पुढे म्हटले आहे, काँग्रेसची अशीच गुन्हेगारांना समर्थन करणारी राजनीती असेल ,तर राज्यातील जनता समजदार आहे ,येत्या २८ नोव्हेंबरला मतदार अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला मतदान करायचे की नाही याबाबत योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास आहे.
मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत एकूण २३० जागा आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत काँग्रेसने १५५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे . त्यात माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा भाऊ आणि पुत्रालाही तिकीट देण्यात आले आहे. राज्यात २८ नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडेल आणि निवडणुकीचा निकाल ११ डिसेंबरला घोषित केला जाणार आहे.




























































