बिडकीन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावरून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडून रस्त्याचं शुद्धीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bidkin-shivsena

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी पैठणमध्ये एका सभेसाठी हजर झाले. मात्र यावेळी संभाजीनगर-पैठण रस्त्यावरून त्यांचा ताफा पुढे जाताच बिडकीनमध्ये शिवसैनिकांनी रस्ता गोमूत्रानं स्वच्छ आणि शुद्ध केला. शिवसेनेचे नवनियुक्त तालुकाप्रमुख मनोज पेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील निलजगाव फाटा ते बसस्टँड रस्ता गोमूत्राने साफ करून शुद्धीकरण केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणमध्ये सभा सुरू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच पैठण येथे सभा घेत आहेत. या सभेसाठी भाडेतत्त्वावर लोकं जमवण्यात आल्याचे ऑडिओ सकाळपासून व्हायरल झाले असून चर्चा सुरू आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांची सभा वादात राहिली आहे. त्यातच आता शिवसैनिकांनी गोमूत्रानं रस्ता शुद्ध केल्यानंतर सभेपेक्षा त्याचीच चर्चा अधिक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत झालेल्या बिडकीनमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे त्याहून मोठे स्वागत घडवून आणण्याचा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं. मात्र गोमूत्र प्रकरणाने त्याचीच चर्चा सतत होत राहिली.

शिंदे यांचा ताफा बिडकीनमधून बाहेर पडून सुमारे चार वाजेच्या सुमारास पैठणकडे रवाना झाला. यानंतर काही क्षणातच शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे, माजी सरपंच अशोक धर्मे आणि त्यांचे सहकारी गनिमीकाव्याने शिंदे यांचा सत्कार झाला त्या निलजगाव फाटा परिसरात आले. त्यांच्या हातात गोमूत्राने भरलेल्या बदल्या, लिंबाच्या फांद्या व अन्य साहित्य होते. काही क्षणातच या सर्वांनी शिंदे यांचा ताफा गेलेल्या निलजगाव फाटा ते बिडकीन बसस्टँड हा सुमारे अर्धा किलोमीटरचा परिसर गोमूत्र शिंपडून स्वच्छ केला. यावेळी ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्या. ता

यानंतर मनोज पेरे यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अशा व्यक्ती आणि त्यांचे सहकारी आमच्या रस्त्यावरून गेल्याने आमचा रस्ता अपवित्र झाला. त्यामुळे आम्ही हा रस्ता गोमूत्र शिंपडून साफ केला, असे पेरे यांनी यावेळी सांगितले.