
दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाच्या जुहू युनिटने जुहू परिसरात ड्रग्जविरोधात धडक कारवाई केली. जुहू समुद्रकिनाऱयाला लागून असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या समोर एमडीएमए हा ड्रग्जचा साठा घेऊन आलेल्या परदेशी ड्रग्ज तस्कराला पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 3 कोटी 37 लाख 50 हजार किमतीचा ड्रग्ज जप्त करण्यात आला.
जुहू-तारा मार्गावर असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या समोर एक परदेशी ड्रग्ज माफिया एमडीएमए हा ड्रग्जचा साठा घेऊन येणार असल्याची खबर एटीएसच्या जुहू युनिटला मिळाली. त्यानुसार युनिटच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून इगवे जॉन याला उचलले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ दोन किलो एमडीएमएचा साठा मिळून आला. हा ड्रग्ज देणारा त्याचा साथीदार पालघर येथे असल्याचे कळताच पथकाने त्या साथीदाराच्या घरावर धडक दिली, पण तो सापडला नाही. मात्र त्या घराच्या झडतीत 250 ग्रॅम एमडीएमएचा साठा सापडला. अशाप्रकारे एटीएसच्या जुहू युनिटने कारवाई करत परदेशी ड्रग्ज माफियाच्या मुसक्या आवळून तब्बल दोन किलो 250 ग्रॅम वजनाचा 3 कोटी 37 लाख 50 हजार किमतीचा एमडीएमए ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला.

























































