
बिग बॉस या प्रसिद्ध रिअॅलिटी शोबाबत प्रसिद्ध अभिनेता जय भानुशाली याने घराबाहेर आल्यानंतर खंत व्यक्त केली. त्याच्यामते बिग बॉसच्या घरात विवाहीत पुरुषाकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार कमी पर्याय असतात.जयच्या मते ‘बिग बॉस हा रिअॅलिटी शो माझ्यासारख्या विवाहितासाठी नाहीच. कुठलीही गोष्ट करताना सतत सतर्क राहावे लागते कारण बाहेर बायको आणि मुलगी आहे याचे सतत भान राखावे लागते. सध्या रिअॅलिटी शोजमध्ये लोकांनी रोमान्स पाहायला जास्त आवडतो. त्यामुळे घरात लव्ह अँगल असेल तर त्याला जास्त महत्व दिलं जातं. विवाहित असल्याने प्रत्येक गोष्ट जपून करावी लागते. सांभाळून राहावे लागते. बोलताना विचार करावा लागतो. आपल्या घरचे हा शो बघत असतील त्यांना बघून चांगले वाटायला हवे. आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचता कामा नये या सगळ्या गोष्टी डोक्यात असतात.’ बिग बॉसच्या घरात मी सहज एखाद्या महिला स्पर्धकाचा हात जरी पकडला तरी ते दिसताना ऑकवर्ड वाटतं असं जयचं म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मनावर एकप्रकारचा सतत ताण असतो, त्यामुळे विवाहितांसाठी बिग बॉस हा शो एक तोटाच आहे असं जयने म्हटलंय. जयच्या या वक्तव्यावर बिग बॉसच्या स्पर्धकांनी मांडलेली मते जाणून घेऊया.
तुम्ही खुलेपणाने फ्लर्ट करु शकत नाही
बिग बॉसच्या पहिल्या आणि चौदाव्या पर्वात स्पर्धक असलेली कश्मिरा शहा जयच्या वक्तव्याशी अंशत: सहमत आहे. घरात सिंगल जाणाऱ्यांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. जे मोकळेपणाने फ्लर्ट करु शकतात मात्र विवाहीतासाठी ते करणं फार कठिण होतं. सुरुवातीला रिअॅलिटी शोमध्ये थोडे वेगळे वारे सुरु होते, त्यात लोकांना भांडण, थरारक टास्क हे पाहायला आवडायचे. मात्र अलिकडे तसे नाहीय. लोकांना आता लव्ह स्टोरी पाहायला जास्त आवडतात. विशेष म्हणजे बिग बॉस 13 पासून हा बदल पाहायला मिळाला- कश्मिरा शहा
एक चूक बाहेर महागात पडू शकते.
बिग बॉस तिसऱ्या पर्वाचे विजेते बिंदू दारा सिंग याच्या म्हणण्यानुसार तोही काहीसा जय भानुशालीच्या वक्तव्याशी सहमत आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोने त्याचा ट्रॅक बदलला आहे आणि विवाहीतांना या शोमध्ये तग धरणं कठीण झालं आहे. विवाहितांना घरात वावरताना बाहेर असलेल्या कुटुंबाचाही विचार करावा लागतो. कारण तिथली एक चूक बाहेर भारी पडू शकते- बिंदू दारा सिंग
स्पर्धक लव्ह अँगल डोक्यात ठेऊन जातात
दिपशिखा नागपाल ही ‘बिग ब़ॉस 8’ च्या पर्वातील स्पर्धक आहे. तिच्या म्हणण्यानुसार अलिकडे स्पर्धक घरात जातानाच घरात रिलेशनशिप बनवायची आहे हे डोक्यात ठेऊन जातात. विवाहितांनी बिग बॉसच्या घरात जाणं खरंतर तोटाच आहे. जर तुम्ही प्रेमात असाल तर तुम्ही तिथे जास्त दिवस टिकाल. त्यामुळे घरात जातानाच स्पर्धक लव्ह अँगल डोक्यात ठेऊन जातात सिंगल असलेल्यांसाठी लव्ह अँगल देणं सहज सोपं होतं मात्र विवाहीतांना ते शक्य होत नाही. तसेच त्यात जर तो प्रसिद्ध अभिनेता असेल तर त्याला त्याची प्रतिष्ठेचीही काळजी घ्यावी लागते कारण प्रचंड मेहनत करुन तो इथपर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळे कोणाला जज नाही करु शकत. दिपशिखा नागपाल
गरजेचे नाही लव्ह स्टोरी असायलाच हवी
पारस छाब्राने मात्र जय भानुशालीच्या उत्तराला खोडून काढत म्हंटलय की गरजेचे नाही की बिग बॉसच्या घरात लव्ह स्टोरी असायलाच हवी. बिग बॉसच्या घरात प्रेमापलीकडेही नाती जपता येतात. चांगली मैत्री, चांगले बॉण्ड असणे गरजेचे आहे. त्यासाठी विवाहीत असणे-नसणे फारसे महत्वाचे नाही. बिगबॉस हा काही किरकोळ शो नाहीये. त्यात फक्त मसाला, लव्ह अँगल एवढंच महत्वाचे नसतात. मैत्री ही देखील प्रेमापेक्षा महत्वाची आहे. मी ज्या शोमध्ये होतो त्यावेळी सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल यांची मैत्री लोकांना बघायला आवडत होती. शिवाय सिद्धार्थ आणि रियाज यांची मैत्रीही लोकांना आवडत होती. त्यामुळे तुमच्यात अशी गोष्ट असायला हवी ज्याने शो आणखी मनोरंजक होईल. मी, सिद्धार्थ, असिम आम्ही तिघं तसेच शेहनाज गिल, हिमांशी खुराना आणि माहिरा शर्मा यांच्यातील संबंध घट्ट होते. जेव्हा टास्क असायचा तेव्हा आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करायचो. त्यामुळे बिग बॉस असा शो आहे, जिथे स्वत:ची ओळख निर्माण करावी लागते, तिच गोष्ट तुम्हाला तिथे टिकाव धरण्यासाठी मदत करु शकते. पारस छाब्रा
विवाहितही बिग बॉस शो जिंकले आहेत
अभिनेत्री शेफाली जरीवालानेही जयचा मुद्दा खोडून काढलाय, राहुल रॉय, बिंदु दारा सिंग, जुही परमार, दिपिका कक्कर, रुबिना दिलैक हे सगळे स्पर्धक विवाहीत आहेत, पण त्यांनी ट्रॉफी पटकावलीच असं तिचं म्हणणं आहे. बिग बॉसचा खेळ बदलत गेला मात्र कोणाच्याही खेळावर त्याचा परिणाम झाला नाही. विवाहीत असल्याने बिग बॉसमध्ये जाण्याचे तुमचे फायदे-तोटे दोन्हीही आहेत. दुसर्या व्यक्तीशी तुमची मैत्री किती आहे हे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या समजुतीवर अवलंबून असते. त्यामुळे हा शो विवाहीतांसाठी नाही असे म्हणता येत नाही. शेफाली जरीवाला






























































