बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. बिहारमधील मधुबनी येथील हरलाखी येथे ते जनेतला संबोधित करत असताना हा प्रकार घडला. यावेळी मंचावर असलेले नितीश कुमार संतापले आणि म्हणाले, ‘आणखीन फेका, फेकत रहा, याचा काही परिणाम होणार नाही.’ या घटनेनंतर त्यांचे सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले आणि त्यांनी नितीश कुमार यांच्या सुरक्षेसाठी कडं तयार केलं. या घटनेनंतरही नितीश कुमार यांनी आपलं भाषण पूर्ण केलं आहे.
दगडफेक करणार्यास सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडण्यास सुरवात केली असता मुख्यमंत्री नितीश यांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, ‘त्यांना सोडून द्या, थोड्या दिवसानंतर ते स्वतःच समजतील.’
या घटनेवर बिहार सरकारचे मंत्री संजय कुमार झा म्हणाले, विरोधी पक्षाने हे मान्य केलं आहे की, ते मतदानाने आपला पराभव करू शकत नाही. म्हणून ते अशा घटना घडून आणत आहेत. विरोधी पक्ष पुन्हा बिहारमध्ये तो काळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीश कुमार यांच्यावर हा जीवघेणा हल्ला आहे. नितीश कुमार यांना तुम्ही पसंद करा किंवा नका करू, याचा निर्णय मतदानानेच होईल. मात्र असा जीवघेणा हल्ला करून काय सिद्ध करायचं आहे, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, याआधी बिहारमधील सकरा येथे निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने एका व्यक्तीने चप्पल फेकली होती. मात्र चप्पल हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचली नव्हती. त्यावेळी नितीश कुमार मंचावर भाषण देत होते.

























































