
बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी भाजपने पक्षांतर्गत घडामोडींचा कानोसा घेण्यासाठी एक अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. पक्षाचे महासचिव, आमदार, प्रदेश उपाध्यक्ष अशा लोकांची या सर्वेक्षणात मते जाणून घेण्यात आली आहेत. 25 ते 28 ऑगस्ट या काळात हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे जो अहवाल तयार करण्यात आलेला आहे तो भाजप नेत्यांना धक्का देणारा आहे असं सांगण्यात येत आहे. या सर्वेक्षणात भाजपला दिसून आले आहे की 15 वर्ष सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांच्याविरोधातील नाराजी वाढली आहे.
नितीश कुमार यांनी सत्तेसाठी आधी भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली होती. नंतर राजदशी काडीमोड घेत पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली होती. यामुळे नितीश यांची विश्वासार्हता कमालीची खालावल्याचेही सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. एकीकडे भाजप लालू प्रसाद यादव यांच्यावर तिखट हल्ले चढवत असताना दुसरीकडे नितीश हे लालू यांच्याबाबत नरमाईचे धोरण स्वीकारत असल्याचेही भाजपच्या लोकांना वाटत आहे.
नितीश यांच्या गेल्या 5 वर्षातील कामकाजावर आपण खूश नसल्याचेही भाजपच्या अनेक नेत्यांनी म्हटले आहे. भाजपच्या या सर्वेक्षणाचा अहवाल बिहारचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना देण्यात आलेला आहे. या दोन्ही भाजप नेत्यांमध्ये अहवालाबाबत चर्चाही झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे बिहारच्या निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांचेच नाव जास्त वापरून प्रचार करायचं ठरवलं आहे. बिहार भाजपने प्रचारासाठी आत्मनिर्भर भारत या वाक्याच्या धर्तीवर आत्मनिर्भर बिहार असे घोषवाक्य या निवडणुकीसाठी तयार केल्याचेही कळते आहे.
भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात नितीश यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसते आहे असा प्रश्न जनता दल युनायटेडचे नेते महेश्वर हजारी यांना विचारला असता ते म्हणाले की त्यांची लोकप्रियता कमी झाली नाहीये तर ती वाढली आहे. त्यांच्याकडे पाहून लोकं मतदान करतील आणि पुन्हा त्यांच्याच नेतृत्वात सरकार बनेल असा विश्वास हजारी यांनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते भाई विरेंद्र यांनी भाजपच्या सर्वेक्षणाबद्दल बोलताना म्हटलंय की आता जदयूच्या मित्र पक्षांनाही हे कळायला लागलं आहे की नितीश कुमार यांचे या निवडणुकीत काही खरे नाही.
























































