
काळाबरोबर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. डिजिटल पेमेंट ही त्यातील एक गोष्ट. रोखीने व्यवहार करण्यापेक्षा लोक गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पेमेंट करू लागले आहेत. आता तर भिकारीसुद्धा डिजिटल झाल्याचे उदाहरण समोर आले आहे.
बिहार येथील राजू पटेलची भीक मागण्याची पद्धती वेगळी आहे. साधारणपणे सुटे पैसे नाहीत म्हणून लोक भीक द्यायला टाळाटाळ करतात. त्यामुळे राजू पटेलने डिजिटल पद्धतीचा पर्याय दिला आहे. त्याने फोन पे, डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट अॅप वापरण्यास सुरुवात केली. पटेल यांच्या कल्पकतेने खूश झालेल्या काही लोकांनी त्यांना ‘देशातील पहिला डिजिटल भिकारी’ असे नाव दिले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनेक वेळा लोकांनी मला रोख रक्कम नाही, असे सांगत भीक देण्यास नकार दिला. ई-वॉलेटच्या जमान्यात आता रोख रक्कम बाळगण्याची गरज नसल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. यामुळे मी बँक खाते आणि ई-वॉलेट खाते सुरू केले, असे राजू पटेल यांनी सांगितले. ते बेतिया येथील रेल्वे स्थानकावरील लोकप्रिय व्यक्ती आहेत.