मुलाच्या मृतदेहासाठी मागितली 50 हजारांची लाच, आई-वडिलांनी भीक मागून गोळा केली रक्कम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील समस्तीपूर येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथे एका वृद्ध दांपत्याला आपल्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह मिळवण्यासाठी दारोदार भीक मागावी लागत आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मुलाचा मृतदेह देण्याच्या बदल्यात 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप या दांपत्याने केला आहे. मात्र एवढे पैसे नसल्याने मुलाला अखेरचे बघण्यासाठी त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली असून याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुलाचा मृतदेह सरकारी रुग्णालयातून आणण्यासाठी पैशाची व्यवस्था करायचीय, असे म्हणत हे दांपत्य दारोदार जाऊन भीक मागत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत मुलाचे वडील महेश ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी माझा 25 वर्षीय मुलग संजीव ठाकूर अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र यात यश आले नाही. अखेर आम्ही पोलिसांमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Baat Bihar Ki (@baatbiharki)

7 जूनला पोलिसांना एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी हा मृतदेह सदर रुग्णालयामध्ये पाठवला. हा मृतदेह ठाकूर यांच्या मुलाचाच असल्याचे स्पष्ट झाले. ठाकूर दांपत्याने रुग्णालयामध्ये धाव घेतली. ओळख पटल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने आपल्याकडे मृतदेह देण्याच्या बदल्यात 50 हजारांची लाच मागितली. मात्र आम्ही गरीब असल्याने एवढी रक्कम कोठून आणणार असे महेश ठाकूर म्हणाले.

मुलाचा मृतदेह रुग्णालयातून घरी नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. त्यासाठी मी आणि माझी पत्नी दारोदार जाऊन भीक मागत आहोत. तसेच लोकांना मदत करण्याचे आवाहनही करत आहोत. लोकांनीही आम्हाला मदत केली. आम्ही भिकारी नाहीत, मात्र मुलाचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यासाठी पैसे जमा करत असल्याचे महेश ठाकूर यांनी सांगितले. मात्र याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनापर्यंत पोहोचल्यावर त्यांना घाम फुटला.

याबाबत समस्तीपूरचे सिव्हील सर्जन डॉ. एस. के. चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा तपास करम्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.