
बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राजदचे अध्यक्ष आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्याकडूनही सरकार स्थापनेची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
तेजस्वी यादव यांनी आज महागठबंधनच्या आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत जनतेचा कौल महागठबंधनलाच असल्याचे स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव यांनी राजदच्या सर्व आमदारांनी पुढील एक महिना पाटण्यातच थांबावे, अशी सूचना केली. जितमराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा, विकसनशील इन्सान पार्टी ‘एनडीए’ मध्ये कशा पद्धतीने सामिल होतात हे पाहून रणनिती आखली जाईल, असे तेजस्वी यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते.
जनमताचा कौल महागठबंधनला; आयोगाचा निकाल ‘एनडीए’च्या बाजूने
- पत्रकार परिषदेत बोलताना तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहारच्या जनतेला बदल हवा होता. जनमताचा कौल महागठबंधनला मिळाला आहे, तर निवडणूक आयोगाने ‘एनडीए’च्या बाजूने निकाल दिला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
- निवडणूक आयोगाबत हे पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले नाही. 2015 मध्येही महागठबंधन होते. तेव्हाही निकाल आमच्या बाजूने होता; पण भाजपने मागच्या दरवाजाने प्रवेश केला, असे तेजस्वी यादव म्हणाले.
- महागठबंधनला 110 जागा मिळाल्या; पण आमचे 20 उमेदवार 100-200 मतांनी पराभूत झाले. पोस्टल बॅलेट आधी मोजायचे हा नियम असताना मतमोजणी पूर्ण झाल्यास का मोजले? असा सवाल त्यांनी केला. नितीशकुमार यांच्यामुळे आमच्या विजयी उमेदवारांना पराभूत केले गेले.
- निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव होता? कोणाच्या सांगण्यावरून फेरफार केली? आयोगाने पोस्टल मतपत्रिकांची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी करताच न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.
- जनतेचे आभार मानण्यासाठी आपण राज्यभर यात्रा काढणार आहोत.


























































