
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील एक तरुण 12 वर्षांनी घरी परतत आहे. बारा वर्षांपूर्वी आपला मुलगा मेला समजून घरच्यांनी त्याचे श्राद्धही घातले होते. परंतु हा तरुण पाकिस्तानमधील तुरुंगामध्ये होता आणि तो आता मायदेशी परत येत आहे. यामुळे त्यांच्या आईला आनंदाश्रू आवरत नाहीय.
छवी (वय – 30) नावाचा एक तरुण 12 वर्षांपूर्वी पंजाबमधून गायब झाला होता. त्याने चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये प्रवेश केला आणि पाकिस्तानी सैन्याला त्याला ताब्यात घेतले होते. आता या तरुणाची तुरुंगातून सुटका करण्यात आली असून बक्सर प्रशासनाचे एक पथक त्याला माघारी आणण्यासाठी गुरदासपूरला रवाना झाले आहे.
छवी गायब झाला तेव्हा कुटुंबियांनी बराच काळ त्याची वाट पाहिली, मात्र कोणतीही खबर मिळाली नाही. बरेच दिवस झाले तरी तो माघारी न आल्याने त्याचा मृत्यू झाला असे समजून कुटुंबियांनी त्याचे श्राद्धही घातले. तसेच त्याच्या पत्नीने दुसरे लग्नही केले. मात्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सरकारने दिलेल्या माहितीनुसार छवी पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने त्याची ओळख पटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. पोलिसांच्या एका पथकाने त्याच्या घरी जाऊनही चौकशी केली. आपला मुलगा जिवंत असल्याची कळतच छवीच्या आईच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले.
दरम्यान, बक्सर जिल्हा प्रशासाने छवी गायब असण्याला दुजोरा दिल्यानंतर हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानकडे त्याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली. 5 एप्रिल रोजी पाकिस्तान सरकारने त्याला अटारी सीमेद्वारे बीएसएफच्या हवाली केले. आता बीएसएफ त्याला गुरदासपूर जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देणार आहे. गुरदासपूर जिल्हा प्रशासनाने याबाबत बक्सर जिल्हा अधिकाऱ्यांना सूचित केले असून डीएमच्या निर्देशानंतर पोलीस अधिकारी निरज कुमार सिंह यांनी छवीला आणण्यासाठी एक पथक गुरदासपूरकडे रवाना केले आहे.

























































