
पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार करत आहेत. गेल्या आठवड्यात नितीश कुमार यांनी राजधानी दिल्लीत जाऊन काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची एकजूट करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विरोधक एकत्र येत असल्यामुळे भाजपचे नेते निराश झाले असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलेली सीबीआयची नोटीस ही त्या नैराश्याचे प्रतिबिंब आहे, अशी टीका नितीश कुमार यांनी केली.
यावेळी नितीश कुमार म्हणाले की, आणखी काही पक्षांशी संवाद साधून माझ्यापुरती जबाबदारी मी पूर्ण करेन. त्यानंतर जागावाटप आणि एकत्रित प्रचार करण्याच्या रणनीतीबाबत सर्व एकत्र येऊन चर्चा करतील आणि निर्णय घेतील. पटनाच्या जवळ असलेल्या बख्तियारपूर येथे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी बिहारमध्ये होत असलेल्या जातनिहाय सर्व्हेची माहिती दिली. यावेळी नितीश कुमार यांच्या समर्थकांनी मध्येच, “देश का पीएम कैसा हो, नितीश कुमार जैसा हो” अशा घोषणा दिल्या. यावर नितीश कुमार यांनी समर्थकांना थांबवून, “अरे भाई, हम नही बनेंगे” असे सांगितले.
नितीश कुमार म्हणाले की, “आम्ही विरोधक निवडणूक एकत्र लढवू इच्छितो. जेव्हा आम्ही एकत्र बसू तेव्हा सर्व बाबी स्पष्ट होतील. कोणता पक्ष कुठे आणि किती जागा लढविणार आणि एकत्रितपणे प्रचार कसा केला जाणार? यावर चर्चा होईल. लोकांचा जो काही कौल असेल तो आम्ही स्वीकारू. शेवटी लोकशाहीत लोकांचे मत अंतिम आहे.”


























































