
बिहारच्या किशनगंज पोलीस ठाण्याचे मुख्य प्रभारी अश्विनी कुमार यांना थेट पश्चिम बंगालमध्ये जाऊन बाईक चोरीच्या तपासात आपला जीव गमवावा लागला आहे.
बिहारमधून बाईक चोरून नेणाऱया टोळीच्या तपासासाठी अश्विनी कुमार शनिवारी सकाळी थेट बंगालच्या इस्लामपूर भागात आपल्या पोलीस पथकासह गेले होते. पण गुन्हेगार टोळीच्या लोकांनी स्थानिक नागरिकांना चिथावणी देत भडकवले आणि जमावाने अश्विनी कुमार यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. बाईक चोर टोळीच्या सदस्यांनी बिहारी पोलीस पश्चिम बंगाल निवडणुकीत हस्तक्षेप करायला आलेत अशी अफवा पसरवत जमावाला भडकवले होते.
अश्विनी कुमार यांच्या पथकाने छापा मारलेला इस्लामपूर भाग बंगालच्या गोलपोखरा मतदारसंघात येतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना गुंडांची चिथावणी खरीच वाटली. बिहारी पोलिसांचे पथक तपासासाठी येताच इस्लामपूरमध्ये जमावाने या पथकाला घेरले. अश्विनीकुमार संतप्त जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. जमावाच्या तावडीत सापडलेल्या अश्विनी कुमार यांना जमावाने बेदम मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अधिकाऱयाला ‘गार्ड ऑफ ऑनर’
बिहारच्या हद्दीतील बाईक चोरीच्या तपासासाठी जीव धोक्यात घालणारे किशनगंज ठाणा प्रभारी अश्विनी कुमार यांचे पार्थिव शनिवारी सायंकाळी सन्मानाने किशनगंज नगर ठाण्याच्या हद्दीत आणण्यात आले.
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अश्विनी कुमार यांना बिहार पोलिसांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. यावेळी जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. आदित्य प्रकाश, पोलीस अधीक्षक कुमार आशीष आणि पोलीस महानिरीक्षक उपस्थित होते. अश्विनी कुमार यांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या बाईक चोर टोळीच्या सदस्यांपैकी तिघांना अटक झाली आहे.



























































