‘चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अन्यथा…’, वादग्रस्त ट्विटवरून वातावरण पेटले, भंडारी समाजामध्ये संताप

भाजपचे वाचाळवीर सध्या बेताल वक्तव्य करत आहेत. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पतितपावन मंदिर बांधले असे ट्वीट केले आहे. प्रत्यक्षात पतितपावन मंदिर दानशूर भागोजीशेठ कीर त्यांनी बांधले असून त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम चित्रा वाघ यांनी माफी मागावी. अन्यथा भागोजीशेठ किरांची 22 गुंठे जागा कोणी हडप केली? 13 गुंठे जागेत काय झाले? हे सर्व आम्हाला उघड करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या नुकत्याच रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पतितपावन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकताना त्यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पूजा केली असा उल्लेख ट्वीटमध्ये केला. या ट्वीटनंतर भंडारी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. दानशूर भागोजीशेठ कीर यांचे कार्य डावलण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भंडारी समाजाकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भंडारी समाजातील काही प्रतिनिधींनी एक पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये म्हणाले की, वडाची सात पिंपळाक अशी सध्या परिस्थिती सुरु आहे. इतिहासाची मोडतोड करण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी वाचाळवीर अशी वक्तव्ये करत आहेत. दानशूर भागोजीशेठ कीर हे आमचे दैवत आहे. त्यांनी केलेले काम प्रचंड मोठे आहे. त्यांना कोणी डावलू शकत नाही. दानशूर भागोजीशेठ कीर यांच्यावरील एक धडा शालेय पाठ्यपुस्तकात घ्या अशी मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे, असे कुमार शेट्ये यांनी स्पष्टपणे सांगताना चित्रा वाघ यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही तोंड उघडू. भागोजीशेठ कीर यांच्या 22 गुंठे जागेचे काय झाले हे आम्ही उघडकीस आणू असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेसचे रमेश शहा यांनी भाजपने खोटं बोलायला, खोटं सांगायला सुरुवात केली आहे. ते राष्ट्रपुरुषांचा अपमान करत आहेत. त्यांच्या बोलण्याला कोणतेही ताळतंत्र नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यानी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यानीही छत्रपती शिवाजी महाराजांबददल चुकीचे विधान केले. हे एकप्रकारे संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपवाले करत आहेत. चित्रा वाघ यांनी जे ट्वीट केले आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे असे शहा यांनी सांगितले. त्यानी हे ट्वीट जाणीवपूर्वक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे अत्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हारिष शेकासन यांनी भाजप चिथावणीखोर वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. आमची एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही एकजूट होऊन चित्रा वाघ यांचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भंडारी समाजाचे सुरेंद्र घुडे यांनी यापूर्वी दोनवेळा अशाच पध्दतीने पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी आम्ही तसे करणाऱ्यांना माफी मागायला लावली होती. त्यानंतर पुन्हा आता ही घटना घडली आहे. चित्रा वाघ यांनी माफी मागावी असे घुडे म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, काँग्रेसच्या रूपाली सावंत उपस्थित होत्या.