
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे जगभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आखाती देशांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच आता कानपूरमध्ये भाजपच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कर्नलगंज पोलिसांनी भाजप नेत्याला अटक केली आहे. हर्षिल श्रीवास्तव असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षिल श्रीवास्तव हा भाजपच्या फ्रंटल संघटनेच्या युवा मोर्चाचा मंत्री असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचाही तो सदस्य आहे. त्याने आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून विशेष धर्माविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादवि कमल 153 ए (धर्म किंवा जातीच्या नावावर द्वेष पसरवणे), कलम 295 ए (धार्मिक भावना भडकावणे), आयटी अॅक्ट कलम 507 आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विजय सिंह मिणा यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या पोस्ट करून शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
54 अटकेत
नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी मुसलमान समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी आता 54 जणांना अटक करण्यात आली आहे. यात पीएफआय संघटनेचा हात असल्याचे प्राथमिक तपासातून दिसत आहे. पोलिसांनी पीएफआयच्या पाच सदस्यांची ओळख पटवली असून तिघांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त विजयसिंह मिणा यांनी याबाबत माहिती दिली.
भाजप नेत्याने महिलेचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले, पक्षाने केली कारवाई
कुवेतमध्ये हिंदुस्थानी उत्पादनांवर बंदी
नुपूर शर्मा तसेच नवीन कुमार जिंदाल या दोन नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. त्याचे देशात पडसाद उमटल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून संतापाचा सूर बाहेर आला आहे. आखाती देशांनी रविवारी भाजप नेत्यांच्या विधानांचा कडक शब्दांत निषेध केला आणि त्याबाबत हिंदुस्थानी दूतावासांना जाब विचारला. त्यानंतर आता आखाती देशांच्या मार्केटमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कुवेत शहरातील सुपरमार्केटनी आपल्या शेल्फमधून सर्व हिंदुस्थानी उत्पादने बाहेर काढली आहेत. त्यावर बंदीचे मोठे फलक लावत भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा जाहीर निषेध नोंदवला आहे. तसेच अल-अर्दिया को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरच्या कर्मचाऱयांनी हिंदुस्थानी चहा व इतर उत्पादनांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शहराबाहेरील सुपरमार्केटमध्ये हिंदुस्थानी तांदूळ, मसाल्यांसह इतर उत्पादने प्लॅस्टिक शीटमध्ये झाकली गेली आहे. तसेच त्यावर ‘आम्ही हिंदुस्थानी उत्पादने काढून टाकली आहेत’, असे अरबी भाषेत लिहिले आहे.





























































