
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेता केएस ईश्वरप्पा यांच्या आणखी एका वादग्रस्त विधानाने वादंग निर्माण झाला आहे. ईश्वरप्पा रविवारी बेळगाव येथील हिंदू कामगारांच्या संमेलनात कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले, हिंदूंची मंदिरं पाडून त्या जमिनीवर बनवलेल्या मशीदी खाली करा. तसे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला.
ईश्वरप्पा म्हणाले, ‘मथुरेसह आणखी दोन ठिकाणांसाठी विचार सुरू आहे. न्यायालयाचा निर्णय एकदा येऊ द्या. आज असो वा उद्या, आम्ही मंदिरांचे बांधकाम सुरू करू. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका नसावी.
ईश्वरप्पा इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, ‘ज्या ठिकाणी मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी स्वेच्छेने त्या खाली करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागले. किती मारले जातील आणि काय होईल हे आम्हाला माहित नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची ईश्वरप्पा यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या विधानांवरुन गदारोळ झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही ईश्वरप्पा यांनी देशातील मंदिरांच्या जागी बांधलेली एकही मशीद सोडली जाणार नाही असे विधान केले होते.


























































