भाजप निष्ठावंत विरुद्ध विखे संघर्ष उफाळला; आमदार राम शिंदे, मोनिका राजळे यांचा उघड विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-logo

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी येथे 26 ऑक्टोबर रोजी येत आहेत़ या अगोदरही केंद्रातील नेते शिर्डी व लोणी याच ठिकाणी आले होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे खासदार पुत्र सुजय विखे पाटील यांना नगर दिसत नाही का? अशा शब्दांत आता पदाधिकाऱयांसह कार्यकर्त्यांनी विचारणा सुरू केल्यामुळे विखेंच्या विरोधातील पक्षांतर्गत संघर्ष हा उघडपणे सुरू झाला आहे. आमदार राम शिंदे व आमदार मोनिका राजळे यांनी थेट प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केल्यामुळे जिह्यामध्ये खळबळ उडाली आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे शिर्डी मतदारसंघाचे नेतृत्व करतात व त्यांचे पुत्र सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नेतृत्व करीत आहेत. या दोघांच्या विरोधात भाजपअंतर्गत संघर्ष हा आता मोठय़ा प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. मध्यंतरी राम शिंदे विरुद्ध महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये तीव्र संघर्ष होऊन एकमेकांबद्दल उणेदुणे काढण्याचा प्रकार घडला होता. त्या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण तोही अयशस्वी झाला आहे.

या अगोदर विखे यांनी लोणी येथे गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना बोलावले होते. शिर्डी मतदारसंघामधील लोणी गावांमध्येच केंद्रातील मंत्र्यांसाठी कार्यक्रम आयोजित केले जात असल्यामुळे भाजपच्या अनेक पदाधिकाऱयांसह कार्यकर्त्यांना खटकत आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी उघडपणे विखे यांना तुम्ही तेथेच का कार्यक्रम घेता? तुम्हाला इतर मतदारसंघ सापडत नाही का, अशी विचारणा करीत नाराजी व्यक्त केली.

भाजपचे मोठे नेते नगरच्या उत्तर भागात येतात, त्यांचे सर्वच कार्यक्रम राधाकृष्ण विखे पाटलांच्या भागात होतात, त्यामुळे दक्षिण नगर जिह्याला कुठेतरी डावललं जात असल्याची भावना त्या ठिकाणच्या नेत्यांमध्ये आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली, तर आमदार मोनिका राजळे यांनी शिर्डीसारखे एखादे मंदिर दक्षिण नगरमध्ये बांधलं पाहिजे, म्हणजे भाजप नेते दक्षिणेलाही येतील, असा टोला लगावला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱयाच्या पार्श्वभूमीवर नगरच्या उत्तर आणि दक्षिणेतील नेत्यांमधील मतभेद समोर आले आहेत.