मध्य प्रदेशातील मंत्रिमंडळात घराणेशाहीचा बोलबाला; भाजप नेत्यांच्या मुलांचा, सुनांचा मंत्रिमंडळात समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 22 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात 8 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभारचे 6 राज्यमंत्री आणि चार राज्यमंत्री पदाची भाजपच्या आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात घराणेशाहीचा बोलबाला दिसला. यामुळे भाजपचे ‘पार्टी विथ डिफरन्स’ शपथविधी वेळी नेमके कुठे गेले होते, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

25 डिसेंबर 2023 रोजी मध्य प्रदेश कॅबिनेटचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात चार नेत्यांच्या मुलांना सहभागी करून घेतले आहे. यात निर्मला भुरिया, विश्वास सारंग, कृष्णा गौर, प्रतिमा बागरी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. निर्मला भुरिया या दिलीप सिंह भुरिया यांच्या कन्या आहेत. दिलीप भुरिया यांचे 2015 साली निधन झाले. विश्वास सारंग हे कैलास सारंग यांचे सुपुत्र आहेत. कृष्णा गौर या माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या सूनबाई आहेत. प्रतिमा बागरी या जय प्रताप बागरी आणि कमलेश बागरी यांच्या कन्या आहेत. प्रतिमा बागरी या केवळ 35 वर्षांच्या असून त्या सर्वात तरुण मंत्री आहेत. कैलाश विजयवर्गीय, तुलसीराम सिलावट, नारायण सिंह कुशवाह, लखन पटेल, नरेंद्र शिवाजी पटेल, विश्वास सारंग, प्रद्युम्न सिंह तोमर, निर्मला भुरिया, संपतिया उइके, कृष्णा गौर, राकेश शुक्ला, कुंवर विजय शाह, उदय प्रताप सिंह, डॉ. मोहन यादव, राजेंद्र शुक्ला, इंदर सिंह परमार, गौतम टेटवाल, नागर सिंह चौहान, धर्मेंद्र भाव सिंह लोधी, करण सिंह वर्मा, दिलीप अहिरवा, राधा सिंह आदींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.