भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे सामाजिक भान हरपले, जेसीबी मधून करुन घेतली फुलांची उधळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवडाभरापासून कोरोनाग्रस्त असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज कोरोना मुक्त झाल्यानंतर हॉस्पिटलसमोरच त्यांच्यावर जेसीबी मधून फुलांचा वर्षांव करण्यात आला. उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी केलेला आक्रीत सोहळा टाळून पडळकरांनी सामाजिक भान जपायला हवे होते मात्र कसलाही विरोध न दर्शविता पडळकरांनी स्वतःवर फुलांची उधळण करुन घेतली.

पंढरपूर मधील गणपती हॉस्पिटलमध्ये आ. पडळकर यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. कोरोनावर मात करुन पडळकर आज स्वगृही निघणार होते. ही बातमी समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल समोर तोबा गर्दी केली. एका वात्रट कार्यकर्त्याने तर जेसीबी मशीन आणून उभा केले.

जेसीबी मशीनचे बकेट फुलांनी भरण्यात आले. पडळकर यांना हॉस्पिटल मधून निरोप देताच कार्यकर्त्यांनी एकच छंद गोपीचंद अशी घोषणाबाजी सुरु केली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत पडळकर हॉस्पिटल बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण सुरु केली आणि जेसीबीचे बकेट त्यांच्या डोक्यावर उलटे करुन पडळकरांना फुलांनी आंघोळ घातली.

कोरोनाचा वाढता कहर आणि त्यामुळे होत असलेले मृत्यू पाहता लोकप्रतिनिधी म्हणून पडळकरांनी सामाजिक भान राखायला हवे होते अशी प्रतिक्रिया समाज मनातून उमटली.