
गोव्याचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार मायकल लोबो यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोमवारी प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा तसेच विधानसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होत असताना त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आतापर्यंत केळंगुट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोबो यांनी मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) आणि गोवा विधानसभेच्या अध्यक्षांना राजीनामा पत्र सादर केले आहे.
राज्याच्या कचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार असलेले लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. मला पुढे काय पावले उचलायची आहेत ते मी बघेन. मी भाजपचाही राजीनामा दिला आहे.
काँग्रेस प्रवेशाबाबत विचारले असता लोबो म्हणाले की, आपली इतर राजकीय पक्षांशी चर्चा सुरू आहे. किनारपट्टीच्या राज्यात भाजपच्या राजवटीवर लोक नाराज असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “भाजप आता सर्वसामान्यांचा पक्ष राहिलेला नाही, असे मतदारांनी मला सांगितले. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना असल्याचा दावाही त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने शनिवारीच गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली असून सर्व 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी गोवा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.





























































