
सामना ऑनलाईन । मंदसौर
मध्य प्रदेश येथील मंदसौर येथे आठ वर्षाच्या मुलीसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरलेला असतानाच भाजपच्या आमदाराने या प्रकरणातील पीडितेच्या पालकांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी भाजप खासदार सुधीर गुप्ता हे पीडित मुलीच्या पालकांन भेटायला आले होते. त्यावेळी भाजप आमदार सुदर्शन गुप्ता यांनी पीडितेच्या पालकांना खासदार गुप्ता यांचे आभार मानायला लावले.
भाजपचे मंदसौरचे खासदार सुधीर गुप्ता हे काल पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांची विचारपूस केल्यानंतर जेव्हा फोटोसाठी सर्व एका रांगेत उभे राहिले त्यावेळी भाजप आमदार सुदर्शन गुप्ता हे मुलीच्या पालकांजवळ गेले व त्यांनी ‘खासदार साहेब खास तुम्हाला भेटायला आले आहेत, त्यांचे आभार माना’ असे मुलीच्या पालकांना दमदाटी करत सांगितले. त्यानंतर आपण काहीतरी चुकीचे बोललो अशी जाणीव झाल्यावर त्यांनी सारवासारव करण्यासाठी, ‘तुम्हाला कोणतीही मदत लागल्यास आम्हाला सांगा’ असे पालकांना सांगितले.
मंदसौर येथे एका आठ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर या नराधमांनी त्या मुलीच्या गुप्तांगात काठ्या टाकून नंतर तिचा गळा चिरला. ती मुलगी मरणासन्न अवस्थेत पडलेली असतानाच हे नराधम तिथेच बसून दारू प्यायले व त्यानंतर तिला तेथेच टाकून निघून गेले. पीडित मुलीवर एमवायएच रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची हालत बघून डॉक्टरही हादरले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे.




























































