
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम असून सर्व उमेदवार त्यांच्या मतदारसंघात प्रचार करत फिरत आहेत. मात्र मंदसौर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदाराला आज प्रचारादरम्यान जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. एका तरुणाने या आमदाराच्या कानशिलात लगावली आहे.
मंदसौर मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या यशपाल सिंह यांना यावेळेस तिसऱ्यांदा भाजपने तिकीट दिले आहे. यशपाल सिंह मंगळवारी त्यांच्या मतदारसंघातील अलावदाखेडी गावात प्रचार करत असताना अचानक एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले मात्र त्या तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले आहे.

























































