VIDEO : भाजप आमदाराच्या मुलीचे दलित तरुणाशी लग्न, वडिलांनी मागे लावले गुंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बरेली

उत्तर प्रदेशमधील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने घरच्यांच्याविरोधात जाऊन एका दलित तरुणाशी लग्न केले आहे. दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे वडील आपल्या जीवावर उठले असून त्यांनी आम्हाला मारायला गुंड पाठवले असल्याचा आरोप साक्षीने केला आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल सांगितले आहे. राजेश मिश्रा हे भाजपचे आमदार आहेत.

बरेलीचे आमदार असलेले राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने काही दिवसांपूर्वी पळून जाऊन अजितेश कुमार या दलित तरुणाशी लग्न केले आहे. या लग्नानंतर वडिलांनी व भावाने आपल्याला व आपल्या नवऱ्याला मारण्यासाठी गुंड पाठवले आहेत. तसेच हे गुंड अजितेशच्या नातेवाईकांना देखील त्रास देत आहेत असा आरोप साक्षीने केला आहे. तसेच जर अजितेशला काही झाले तर ती तिच्या वडिलांना व भावाला तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही साक्षीने दिला आहे.

मिश्रा यांचे गुंड साक्षी व अजितेशच्या मागावर असून त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ते सतत त्यांची राहण्याची जागा बदलत असल्याचे देखील साक्षीने सांगितले आहे. त्यामुळे साक्षीने त्या दोघांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी बरेलीच्या पोलीस निरक्षकांकडे केली आहे.