काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना जन्म देतो, भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गोंडा

भारतीय जनता पार्टीमधील वाचाळविरांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धाच सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील केसरगंज येथील भाजप खासदार आणि हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी जम्मू-कश्मीरचे काँग्रेस नेते सैफुद्दीन सोज यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना जन्म देतो, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गोंडामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या समिक्षा बैठकीमध्ये सहभागी झाल्यानंतर सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘काँग्रेस कधी आपल्या लष्करावर प्रश्न उपस्थित करते, कधी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करते तर कधी एन्काऊंटवर प्रश्न उपस्थित करते. काँग्रेसचे सैफुद्दीन सोज आणि गुलाम नबी आझाद यांनी ज्याप्रकारे कश्मीरबाबत वक्तव्य केले आहे, त्यावर पक्षाने आपली बाजू स्पष्ट करायला हवी. कमीत कमी सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली बाजू स्पष्ट करायला हवी.’

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘आम्हाला माहीत आहे की ते (काँग्रेस) आपली बाजू स्पष्ट करणार नाही. मतांसाठी ते आणखी किती घसरू शकतात हे सांगता येणे शक्य नाही. त्यांना लष्कराशी देणे-घेणे नाही. लष्करासाठी मानवाधिकार नाही, जवानासाठी मानवाधिकार नाही पण त्यांचे मानवाधिकार फक्त दहशतवाद्यांसाठी आहे. काँग्रेस दहशतवाद्यांना जन्म देते आणि ही समस्या काँग्रेसचेच देणे आहे.’