भाजपच्या खासदाराचा अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश, पक्षाला मोठा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
harish-meena

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात सध्या विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष धक्कातंत्र वापरत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे विद्यमान खासदार हरीश मीणा यांनी पक्षाला राम-राम करत अचानक काँग्रेसचा हात पकडला आहे. त्यामुळे भाजपला फटका बसणार असं बोललं जात आहे.

हरीश मीणा यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. दौसा मतदार संघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले त्यांचे भाऊ नमो नारायण मीणा यांना त्यांनी पराभूत केलं. त्यावेळी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती.

यंदा हरीश यांना उदयपूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून तिकीट हवं होतं. मात्र त्यांना नकार देण्यात आला. त्यामुळे नाराज हरीश यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचं ठरवलं. मात्र आज त्यांनी दिल्लीत अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट देखील उपस्थित होते. मीणा बंधुंचे ग्रामीण भागात प्रचंड वर्चस्व त्याचा परिणाम भाजपला मतांमधून दिसेल असे सांगण्यात येत आहे.