श्रेय लाटण्यासाठी मालाडच्या उद्यानाच्या नावावरून भाजपचे पुन्हा राजकारण, शिवसेनेमुळे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्यामुळे मालाड येथील उद्यानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या बाजार उद्यान समितीच्या बैठकीत 23 फेब्रुवारी 2022 रोजी एकमताने मंजूर झाला असताना आता भाजपकडून  श्रेय लाटण्यासाठी मैदानाचे ‘टिपू सुलतान’ नाव आपणच हटवल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत पर्यटन आणि मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट केल्याने शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मालाड पश्चिम मालवणी येथे नगर भू क्रमांक 2841 येथील जिल्हाधिकारी जमिनीवर हे मैदान आहे. या मैदानाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून करण्यात आले आहे. पालिकेकडून या मैदानाला कोणतेही नाव देण्यात आले नव्हते. मात्र या मैदानाला पालिकेकडून ‘टिपू सुलतान’ नाव देण्यात आल्याचे सांगत भाजपकडून शिवसेनेवर नाहक आरोप करण्यात आले होते. मात्र उद्यानाला ‘टिपू सुलतान’ यांचे नाव पालिकेकडून कधीही देण्यात आले नव्हते, असे तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते. यावेळी शिवसेनेकडून संबंधित उद्यानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली होती. याबाबत तत्कालीन उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, ‘पी/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, शिवसेना नगरसेवक एकनाथ हुंडारे, शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, नगरसेविका गीता भंडारी, विनया सावंत यांच्याकडूनही पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र आता या उद्यानाला ‘टिपू सुलतान’ असलेले नाव आपणच बदलल्याचा कांगावा भाजपकडून केला जात आहे.

तोपर्यंत क्रांतिकारक अश्फाक उल्ला खान यांचे नाव – जिल्हाधिकारी

स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे या मैदानाला असणारे ‘टिपू सुलतान’ हे नाव बदलण्यात आले आहे. मात्र मैदानाचे नाव देण्याचा अधिकार पालिकेला असल्याने नवे नाव देण्यासाठी पालिकेला तीन महिन्यांपूर्वी प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. तोपर्यंत कोणताही वाद होऊ नये यासाठी थोर क्रांतिकारक अश्फाक उल्ला खान यांचे नाव तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले आहे. याला स्थानिक आमदार आणि खासदारांनीही पाठिंबा दिला असल्याची माहिती मुंबई उपनगर जिह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

शिवसेनेने आंदोलनही केले

या मैदानाच्या प्रवेशद्वारावर असलेला टिपू सुलताना नावाचा फलक हटवावा आणि स्त्र्ााr-शक्तीचा सन्मान करण्यासाठी या मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव द्यावे यासाठी शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन करण्यात आले होते. यानंतर पालिकेच्या बाजार व उद्यान समितीत प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता, अशी माहिती माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी दिली.