
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्टाइकबाबत सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानावरून वाद चिघळत आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पित्रोदा यांनी केलेल्या विधानाशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहमत आहेत काय असा सवाल शहा यांनी केला आहे. ते या विधानाशी सहमत नसतील तर या विधानाबाबत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही शहा यांनी केली आहे. पित्रोदा यांच्या विधानावरून काँग्रेसला घेरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस वोटबँकेचे राजकारण करत असल्याचा आरोपही शहा यांनी यावेळी केला.
Amit Shah on Sam Pitroda’s remark on #airstrike: If a country shouldn’t be held responsible for deeds of 7-8 ppl, does Congress believe that Pakistan govt&military has a connection with terror attacks here? If there is a connection,who is the culprit, Congress party should answer https://t.co/AE3pTfZmiB
— ANI (@ANI) March 23, 2019
पाकिस्तान हिंदुस्थानात दहशतवाद पसरवत आहे. दहशतवाद्यांना उत्तर देण्याची गरज नाही काय, असा सवालही त्यांनी केला. निवडणुका जवळ आल्यावर काँग्रेस तुष्टीकरणाचे धोरण अवलंबत वोटबँकेचे राजकारण करत असल्याचा आरोपही शहा यांनी केला. पित्रोदा यांनी शहिदांचा अपमान केला आहे. शहिदांपेक्षा तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेसमध्ये वरचढ ठरत आहे. काँग्रेसकडून होणाऱ्या अशा विधानांमुळे पाकिस्तानला चेव चढत असून दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही शहा यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष एअर स्ट्राईकबाबत सवाल उपस्थित करत आहे. असे सवाल का विचारण्यात येत आहेत, जवानांचा अपमान का करण्यात येत आहे असा सवालही शहा यांनी केला. पित्रोदा यांनी केलेल्या विधानाबाबत राहूल यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही शहा यांनी केली.
जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात येतात, तेव्हा तुम्ही तिथे पोहचता, काही गटांना संतुष्ट करण्यासाठी जवानांनी केलेल्या कारवाईबाबत सवाल करतात, हे सगळे वोटबँकेचे राजकारण असल्याचा आरोप शहा यांनी केला. काँग्रेस नेते वक्तव्य करतात, त्यावरून वाद झाल्यावर ते आपले वैयक्तीक मत असल्याचे स्पष्ट करतात. त्यामुळे त्यांचे बोलविते धनी मोकळेच राहतात. मात्र, काँग्रेसचा खरा चेहरा जनतेला समजला आहे. त्यामुळे राहुल यांनी पित्रोदा यांच्या विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी शहा यांनी केली.






















































