… म्हणून जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडलो, शहांनी सांगितलं खरं कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे जम्मू-कश्मीरला गेले आहेत. शहा हे जम्मू-कश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि भाजपचे प्रेरणास्थान श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘बलिदान दिवस’ कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये त्यांना पीडीपीसोबतची युती का तोडली याचे खरं कारण सांगितलं आहे.

अमित शहा म्हणाले, ‘जम्मू-कश्मीरमध्ये ज्या अटी आणि शर्तींवर पीडीपीसोबत मिळून सरकार बनवण्यात आले होते, त्याची अंमलबजावणी झाली नाही. पीडीपीने जम्मू-कश्मीर आणि लडाखसारख्या मुद्द्यावर भेदभाव केला आणि कश्मीर खोऱ्यामध्ये शांतता बनून राहावी यासाठी योगदान दिले नाही. जेव्हा सरकार बनवण्यात आले होते तेव्हा एक विशेष मसूदा तयार करण्यात आला होता. या मसुद्याद्वारे मुफ्ती यांनी सरकारसमोर ३ गोष्टी ठेवल्या होत्या.’

‘पहिले, जम्मू-कश्मीरमध्ये संतुलित विकास केला जाईल. जेवढा विकास कश्मीर खोऱ्याचा होईल तेवढाच जम्मू, लडाखचाही होईल ही प्रमुख गोष्ट मांडण्यात आली होती. दुसरे, राज्यात शांतता राखण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. येथील हुर्रियत नेत्यांचे जे आंदोलन आहे ते संपुष्टात आणणे, येथील दहशतवाद संपण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करेल आणि तिसरे जम्मू-कश्मीर हिंदुस्थानचे अभिन्न अंग होईल. या तिन्ही अटिंवर समाधानकारक चर्चा झाली, असे शहा म्हणाले. यासाठी चार वर्ष वाट पाहिली, मोदी सरकारने प्रचंड पैसा पाठवला. कश्मीर खोऱ्यासाठी, लडाखसाठी, जम्मूसाठी विशेष निधी पाठवला. ८० हजार कोटींचे पॅकेज दिले. मोदी एक डझनपेक्षा जास्तवेळा येथे आले. सत्तेमध्ये बसलेल्या भाजप नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी राज्याच्या संतुलित विकास आणि शांततेसाठी वारंवार दबाव टाकला, परंतु काहीच सिद्ध झाले नाही. एक वेळ तर लष्कराचा जवान औरंगजेबचे अपहरण करून हत्या करण्यात आली. एका पत्रकाराला, एका संपादकाची हत्या करण्यात आली. सत्तेमध्ये बसून हे असे होणार असेल तर यापेक्षा विरोधी पक्षामध्ये बसून हे मुद्दे उचलून धरण्याचे आम्ही ठरवले’, असे शहा म्हणाले.

काँग्रेसला लाथाडले
काँग्रेस नेते सैफुद्दीन सोज यांच्या कश्मीर आणि लश्कर-ए-तोएबाच्या संबंधीत वक्तव्यावर शहा यांनी निशाणा साधला. ‘काँग्रेस नेते कश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करतात आणि लश्कर-ए-तोएबा ही दहशतवादी संघटना त्यांचे समर्थन करते. राहुल गांधींनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे. काँग्रेस आणि लश्कर-ए-तोएबामध्ये हे कशाप्रकारचे संबंध आहेत? असा सवाल शहा यांनी उपस्थित केला. तसेच भाजप जम्मू-कश्मीरला हिंदुस्थानपासून कधीही वेगळे होऊ देणार नाही’, असे उद्गार त्यांनी काढले.