
उमेदवारांची यादी जाहीर होताच कर्नाटक भाजपमध्ये बंडखोरीचा ज्वालामुखीच फुटला आहे. तिकीट न मिळाल्याने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठवडय़ात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनीही भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
कर्नाटकातील बोम्मई सरकारवर दररोज भ्रष्टाचाराचे नवनवे आरोप होत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जर्जर झालेल्या भाजपच्या मानगुटीवर आता बंडखोरीचे भूत बसले आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी शनिवारीच पत्रकारांशी बोलताना थेट पक्षश्रेष्ठाrलाच धमकी दिली होती. शेट्टार यांना हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून तिकीट हवे होते, मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनीही शेट्टार यांना तिकीट न मिळाल्यास उत्तर कर्नाटकात भाजपला किमान 20 ते 25 जागांवर फटका बसेल अशी भीती व्यक्त केली होती. शेट्टार हे लिंगायत समाजाचे नेते असून हा मतदारही भाजपपासून दुरावण्याची शक्यता येडियुरप्पा यांनी बोलून दाखवली होती.
जगदीश शेट्टार यांनी रात्री उशिरा भाजपचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तिकीट नाकारून पक्षाने आपला घोर अपमान केला आहे. मला तिकीट मिळू नये यासाठी पक्षातच कट रचण्यात आला असा आरोपही त्यांनी केला.
तिकीट न मिळाल्याने भाजप सोडलेले नेते
- कर्नाटक सरकारमधील विद्यमान मंत्री आणि सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले एस. अंगारा
- माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी
- माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार
- मुडिगेरेचे आमदार कुमारस्वामी
- हवेरीचे आमदार नेहरू ओळेकर
- होसदुर्गाचे आमदार गोलिहट्टी शेखर
- कुडलिगीचे आमदार एन. वाय. गोपालकृष्ण
- विधान परिषदेचे आमदार आर. शंकर
- माजी मंत्री आमदार के. एस. ईश्वरप्पा
- उडुपीचे आमदार रघुपती भट्ट



























































