भाजप तृणमूलच्या पोस्ट कार्ड युद्धात केंद्र सरकारला साडे तीन कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-and-mamata

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना डिवचण्यासाठी जय श्रीराम लिहिलेले पोस्ट कार्ड पाठवणे सुरू केले आहे. त्याचे उत्तर म्हणून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपला जय बांगला जय काली लिहिलेले पत्र पाठवण्यास सुरूवात केली आहे. खरंतर या युध्दाचा ताण केंद्राच्या तिजोरीवर बसणार आहे. यामुळे केंद्र सरकारला 3 कोटी 53 लाख रुपयांचा फटका बसणार आहे.

भाजप ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेले 10 लाख पोस्ट कार्ड पाठवणार आहे. तर प्रत्युत्तरादाखल तृणमूल भाजपला जय काली लिहिलेले 20 लाख कार्ड पाठवणार आहे. एका पोस्ट कार्डाची किंमत 12 रुपये 15 पैसे इतकी आहे. पोस्ट खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतं. केंद्र सरकार एक पोस्ट 50 पैशांना विकतं. जर दोनी पक्षांनी एकमेकांना एकूण 30 लाख पोस्ट कार्ड पाठवली तर 50 पैश्यांच्या हिशोबाने केंद्र सरकारला 3 कोटी 53 लाख रुपयांचे नुकसान होणार आहे.

भाजप हे जय श्री रामचे कार्ड फक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पाठवत आहे. परंतु तृणमूलचे कार्यकर्ते हे जय बांग्लाचे कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार लॉकेट चॅटर्जी, अर्जुन सिंह, मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना पाठवत आहेत.

जय श्रीराम म्हटल्या प्रकरणी ममता बॅनर्जी यांनी काही लोकांवर कारवाई केली होती. यावर भाजपने बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेले पोस्ट कार्ड पाठवण्याचे ठरवले होते.