
अॅक्युप्रेशर, फिजीओ थेरपी, स्पिच थेरपी यासह इतर आवश्यक उपचारांची सुविधा असणारे स्वतंत्र उपचार आणि अद्ययावत सुविधा केंद्र पालिका विशेष मुलांसाठी सुरू करणार आहे. या अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटरकरिता ई विभागातील मुंबई सेंट्रलमधील भायखळा विभागाच्या बोमन बेहराम मार्ग येथे डीसीआर 33(7) नुसार पालिकेला जागा मिळाली आहे.
या सेंटरमधील सुविधेसाठी पालिका सुमारे 7 कोटी 5 लाखांचा खर्च करणार असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
मुंबईत विशेष मुलांची संख्या मोठी आहे. यामध्ये गोरगरीब मुलांचाही समावेश असतो. अनेक वेळा अशा मुलांना योग्य उपचार आणि प्रकृतीच्या सुधारणेसाठी आवश्यक सुविधा मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते आमदार रईस शेख यांनी 2018 मध्ये मुंबई महानगर पालिकेकडे अशा प्रकारचे केंद्र उभारण्याची मागणी केली होती.
5 ते 10 टक्के बालकांमध्ये जन्मजात मेंदूसंबंधी आजार तसेच काही व्यंग आढळतात. त्याचा मुलांच्या वाढीवर विपरीत परीणाम होऊ शकतो. त्यासाठी मुंबईत अशा प्रकारच्या केंद्र उभारावे असे शेख यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने या अर्ली इन्व्हेन्शन सेंटर कार्यवाही सुरू केल्याने सर्वसामान्य आणि गरजु पुटूंबातील मुलांनाही चांगले उपचार मिळून त्यांच्या जिवनाचा स्तर उंचावण्यास मदत होणार आहे असे शेख यांनी सांगितले.
मुंबई सेंट्रल मधील भायखळा विभागातील सीएस क्र. 227 वरील आशीर्वाद को-ऑप. हाऊसिंग सोसायटी अलेक्झांड्रा सिनेमासमोर बोमन बेहराम मार्ग येथील डीसीआर 33(7) नुसार मिळालेल्या मालमत्तेत हे अर्ली इंटर्व्हेन्शन केंद्र सुरू केले जाणार आहे.
असा राबवणार उपक्रम
या केंद्रात हाडांचे, शरीरातील विविध अवयावांचे व्यंग, स्पिच थेरपीतून बोलणे सुधारवणे असे उपचार होणार आहेत. त्याच बरोबर नाक-कान -घशाचेही उपचार होणार आहेत. विशेष मुलांमध्ये शारीरिक आणि मेंदूच्या व्यंगामुळे बालकांना चालणे, बोलणे, कमी ऐकू येणे अशा समस्या असतात. तसेच नाक, कान, घशाचेही आजार असतात.
महानगर पालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करुन हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लवकरच या केंद्राचे काम सुरु होणार आहे. या केंद्राचा आराखडा बालकांना खिळवून ठेवेल असा आकर्षक बनवण्यात येणार आहे. प्रसिध्द आर्पिटेक्ट हफिज कंत्राटदार यांनी हा आराखडा मोफत बनवून दिला आहे.


























































