भविष्यातील आव्हानांच्या सुसज्जतेसाठी वैद्यकीय साधने, यंत्रे देणगी स्वरूपात देण्याचे महापालिकेचे आवाहन

648

महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सदैव सजग असणारी आपली बृहन्मुंबई महापालिका सध्या ‘कोरोना कोविड १९’ या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने व अथकपणे करीत आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह चार प्रमुख रुग्णालये, सोळा उपनगरीय रुग्णालये आणि १७४ दवाखाने येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, उप वैद्यकीय कर्मचारी इत्यादी अक्षरश अहोरात्र कार्यरत असून सदैव सजग व सुसज्ज आहेत.

‘कोरोना कोविड १९’ बाधित रुग्णांना अव्याहतपणे सातत्यपूर्ण सेवा देत असलेल्या या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची देखील परिपूर्ण काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. *करोना संसर्गाची व्यापकता लक्षात घेता व भविष्यातील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्याच्या तयारीचा व सुसज्जतेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्हेंटिलेटर, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ अर्थात पी. पी. ई., सॅनीटायझर, ग्लोव्हज, मास्क इत्यादी वस्तूंच्या स्वरूपात देणगी देण्याचे आवाहन महापालिकेने यापूर्वीच केले आहे.

या अनुषंगाने अनेक कॉर्पोरेट हाऊसेस, दानशूर संस्था वा व्यक्ती यांनी यापूर्वीच स्वतःहून पुढे येऊन वैद्यकीय साधने व यंत्रे यांची देणगी दिली आहे. त्यांच्या या सकारात्मक व स्वयंस्फूर्त भूमिकेचे स्वागत करतानाच महापालिकेने त्यांच्या या सामाजिक दायित्वाच्या भावनेबाबत शतशः ऋण व्यक्त केले आहे.

तथापि, भविष्यातील आव्हानांच्या संभाव्य व्यापक तेच्या पार्श्र्वभूमीवर आता महापालिकेने दानशूर संस्था व नागरिकांना वस्तू स्वरुपात देणगी देण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. देणगी म्हणून देणे अपेक्षित असलेल्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने व्हॅंटिलेटर, पी. पी. ई., सॅनिटायझर, ग्लोव्हज़, मास्क इत्यादी वैद्यकीय साधनांचा समावेश आहे. वरील अनुषंगाने दानशूर संस्था व व्यक्तींनी आपल्या वस्तू स्वरूपातील देणगीची नोंदणी महापालिकेच्या खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Link : http://stopcoronavirus.mcgm.gov.in/help-mumbai-combat-covid19

किंवा

Link : https://bit.ly/39rG7JK

आपली प्रतिक्रिया द्या