उत्सव काळात अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या 31 जणांविरोधात गुन्हा, 775 जणांविरोधात न्यायालयीन कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सण-उत्सवाच्या काळात अनधिकृतपणे बॅनर, पोस्टरबाजी करणाऱ्या 31 जणांविरोधात मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाने गुन्हा दाखल केला आहे तर 775 जणांविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षात 28 हजार 677 अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स हटवल्याची माहिती परवाना विभागाने दिली.

मुंबईत सणासुदीच्या काळात अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सविरोधात कारवाई केली जाते. 2021मध्ये 16 हजार 837 बॅनरवर कारवाई करण्यात आली. 943 लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यापैकी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर 290 लोकांविरोधात न्यायालयात केस दाखल करण्यात आल्या आहेत. 2022मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत 11 हजार 840 बॅनर्सवर कारवाई करण्यात आली. 681 जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यापैकी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर 485 जणांविरोधात न्यायालयात केस दाखल करण्यात आल्या आहेत.

गेल्या दीड वर्षात 28 हजार 677 बॅनर्सवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत 1 हजार 624 तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्या असून 31 गुन्हे दाखल करण्यात आले असून 775 जणांविरोधात न्यायालयात केस दाखल करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या परवाना विभागाकडून देण्यात आली आहे.