बोरिवलीत 326 झोपड्यांवर महानगरपालिकेचा बुलडोझर, 200 कर्मचारी, 30 अधिकारी, 70 पोलीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आर/मध्य’ बोरिवली पश्चिम भागात गोराई येथे रस्त्यानजीक बांधण्यात आलेल्या तब्बल 326 झोपडय़ांवर पालिकेने बुलडोझर फिरवला आहे. यातील 133 पात्र झोपडीधारकांचे मल्हारराव कुलकर्णी रस्त्यावरील प्रकल्पबाधितांसाठी असणाऱया घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे बोरिवली रेल्वे स्थानकाडून गोराईकडे जाणारा 600 मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

बोरिवली पश्चिम येथील गोराईस्थित ग्लोबल पॅगोडा, गोराई समुद्रकिनाऱयाकडे जाणाऱया रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या झोपडय़ांमुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत होता. शिवाय गलिच्छ वस्ती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-7 च्या उपायुक्त भाग्यश्री कापसे, आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईप्रसंगी महानगरपालिकेचे 200 कर्मचारी, 30 अधिकारी उपस्थित होते. तसेच 70 पोलिसांचा ताफादेखील यावेळी हजर होता. या झोपडय़ा निष्कासित केल्यानंतर जवळपास 600 मीटरचा रस्ता रहदारीसाठी खुला झाला. दरम्यान, पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले असून उर्वरित 40 झोपडीधारक सशुल्क पुनर्वसनांसाठी पात्र ठरणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा होणार फायदा

– ग्लोबल पॅगोडा, गोराई समुद्रकिनाऱयाकडे जाणाऱया पर्यटकांना गोराई रोडवरूनच ये-जा करावी लागते. त्यातील बहुसंख्य पर्यटक गोराई गावातील विविध ठिकाणी भेटदेखील देतात, परंतु या रस्त्यावर सन 1995 पासून महात्मा फुले नगर झोपडपट्टी अस्तित्वात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

– गोराई समुद्रकिनारा येथील पर्यटनाला चालना मिळावी तसेच रस्ता रहदारीसाठी खुला व्हावा यासाठी ही कारवाई करण्यात आली. या परिसरात पर्यटकांनी यावे, पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या हेतूने महानगरपालिकेने विविध सुशोभीकरणाची कामेदेखील केली आहेत.