पालिकेतील सेवेचा शेवटचा दिवस ठरणार अविस्मरणीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नोकरीतील ‘शेवटचा दिवस गोड व्हावा’ अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यानुसार पालिकेत प्रदीर्घ सेवा देणाऱया कर्मचाऱयांचा निवृत्तीचा क्षण अधिक ‘गोड’ व्हावा यासाठी सेवानिवृत्त होणाऱया कर्मचाऱयांना वरिष्ठ अधिकाऱयांच्या हस्ते महापालिकेचे बोधचिन्ह असलेले सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रशासकीय प्रस्तावाला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजुरी दिल्याची माहिती ‘अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प’ संचालक विनोद चिठोरे यांनी दिली.

या प्रस्तावानुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱया कर्मचाऱयांना महापालिकेचे बोधचिन्ह असलेले सन्मानचिन्ह देण्यात येणार असून प्रति सन्मानचिन्ह रुपये 2 हजार 500 रुपयांपर्यंत खर्च करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. तर सेवेचा गौरव करणाऱया प्रमाणपत्राचे आरेखन व मुद्रण हे पालिकेच्याच भायखळा येथील छापखान्यात करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या प्रमुख लेखापाल यांनी स्वतंत्र लेखाशीर्ष (Account Head) तयार करण्याचेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.