
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह सेव्हन हिल्ससारख्या रुग्णालयांमध्ये ‘कोरोना’विरुद्धच्या लढय़ासाठी पालिकेने 200 तज्ञ डॉक्टर्स, हजारो कर्मचारी आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा 24 तास सज्ज ठेवली आहे. यामध्ये संशयितांची तपासणी, उपचार आणि ‘कोरोना चाचणी’ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी दिवसरात्र काम करीत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी पालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट आहे. विमानतळावर संशयित आढळल्यास थेट कस्तुरबात उपचारासाठी आणले जात आहे. शिवाय अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 24 डॉक्टरांची टीम सहायक कर्मचाऱ्यांसह तीन पाळ्यांमध्ये 24 तास कार्यरत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे सर्व अतिरिक्त आयुक्तांसह संबंधित यंत्रणेशी थेट आणि व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क ठेवून आढावा घेत आहेत. यामध्ये ई-मेल, व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून आवश्यक सूचनाही देण्यात येत आहेत. दरम्यान, विषाणू प्रजातीमधील ‘कोरोना’ची लागण झाल्यास सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनालाही त्रास होतो. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांत पाच दिवस औषधोपचार करूनही आराम पडला नाही तर जवळचा डॉक्टर किंवा पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोणतीही शंका असल्यास 1916 वर विचारा
पालिकेच्या माध्यमातून ‘कोरोना’ची माहिती देण्यासाठी आपत्कालीन विभागात 1916 या क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी 24 तास तज्ञ डॉक्टर तैनात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणतेही लक्षणे आढळल्यास मुंबईकर आपली शंका तज्ञ डॉक्टरला विचारू शकत आहेत.
समन्वयातून काम करणे महत्त्वाचे असल्यामुळे व्हॉटस्ऍपसारख्या सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. यामध्ये त्या त्या विभागातील डॉक्टर्स-कर्मचारी, अधिकारी यांचे व्हॉटस्ऍप ग्रुप तयार करून समन्वय साधला जात आहे. सरकारशी समन्वय साधण्यासाठी आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह खास अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे.
अशी आहे बेडची व्यवस्था
कस्तुरबा – 100, एच. एन. रिलायन्स – 30, सेव्हन हिल्स – 100, नानावटी – 4, जसलोक – 25, मुंबई हॉस्पिटल – 4, कोकीलाबेन – 17, फोर्टिस – 2, रहेजा – 22, लीलावती – 10, हिंदुजा – 12.




























































