मालाडमध्ये सुसज्ज कोरोना रुग्णालय, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमएमआरडीएमार्फत मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या विविध कामांची आज मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. मालाड (पश्चिम) येथे एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येत असलेल्या कोरोना रुग्णालयाच्या कामाची पाहणी करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी मुंबईत पुरेशा उपचार सुविधांची उपलब्धता करण्यात येत आहे. तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन मालाडमध्ये हे कोरोना रुग्णालय उभारण्यात येत आहे, असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोना रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर मालाड (पूर्व) येथील भूस्खलन झालेल्या जागेला भेट दिली. मागील वर्षी भूस्खलन झालेल्या या जागेवर यंदा एमएमआरडीएमार्फत आयआयटीच्या सहयोगातून भूस्खलन रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यात आली. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएमार्फत काम सुरू असलेल्या कलानगर उड्डाणपुलाच्या मार्गिकेची पाहणी केली. या मार्गिकेचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, जेणेकरून कलानगर जंक्शन येथील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी उपस्थित होते.