
भंडाऱयाच्या भीषण आग दुर्घटनेनंतर पालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व नर्सिंग होम, रुग्णालयांची झाडाझडती घेण्यात येत असून तब्बल 663 रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व रुग्णालयांना पालिकेने नोटीस बजावली असून तीन महिन्यांत आवश्यक कार्यवाही करा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर सेंटरमध्ये 9 जानेवारीला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा दुर्दैवी बळी गेल्यामुळे सर्वच रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे 11 जानेवारीपासूनच पालिकेच्या अग्निशमन दलाकडून तातडीने मुंबईतील नर्सिंग होम, रुग्णालयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी अशा एकूण 1324 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यातील तब्बल 663 ठिकाणी अग्निसुरक्षेत त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित सर्व रुग्णालयांना तातडीने नोटीस बजावण्यात आली असून तीन महिन्यांत अग्निसुरक्षेच्या यंत्रणा उभारण्यास सांगण्यात आल्याची माहिती उपमुख्य अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी दिली.
जनजागृतीसाठी 6 हजार स्वयंसेवक
नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे आगीच्या दुर्घटना घडणे, दुर्घटनांत जीवित-वित्तहानी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये जनजागृतीसाठी प्रशिक्षित 5900 स्वयंसेवकांची टीम तयार करून जनजागृती करण्यात येत असल्याची माहितीही उपमुख्य अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी दिली. लवकरच ही संख्या वाढवली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
पालिका रुग्णालयांमध्ये थरारक मॉकड्रिल
- आग लागल्याबरोबर त्या ठिकाणाहून पळ न काढता स्वतःला आणि इतरांना कसे वाचवावे यासाठी अग्निशमन दलाकडून रुग्णालये, सोसायटय़ांमध्ये थरारक ‘मॉकड्रिल’ घेण्यात येत आहे.
- पालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांत पहिल्या टप्प्यात मॉकड्रिल पूर्ण झाले असून दुसरा टप्प्यात पुन्हा मॉकड्रिल घेण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.




























































