
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 28 मार्चला असलेला होळी आणि 29 मार्चला असलेला धुलीवंदन हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मुंबई महापालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. या सणामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
खाजगी किंवा सार्वजनिक परिसरात होळी आणि धुलीवंदन साजरा करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच ‘मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत वैयक्तीकरित्याही हा सण साजरा करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मनाई आदेशाचे पालन करून नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात साथरोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 आणि भारतीय दंड विधानाच्या 1860 कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.






























































