अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखणार, महापालिकेकडून ओआरएस, झिंक गोळ्यांचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना अत्यंत माफक दरात आरोग्य सुविधा पुरवणारी मुंबई महापालिका पावसाळ्यांत अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवत असून 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ओआरएस आणि झिंकच्या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या 4 हजार आरोग्यसेविका या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.

‘राष्ट्रीय अतिसार नियंत्रण कार्यक्रम’अंतर्गत 15 जुलैपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात असून अतिसारामुळे होणारे बालमृत्यू पूर्णपणे रोखणेे, हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. मुंबई महापालिकेच्या 4 हजार आरोग्यसेविका घरोघरी भेट देऊन 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप करत आहेत. त्यामुळे बाळाचे जुलाब, हगवण या आजारांपासून संरक्षण होणार आहे. दरम्यान, बालकांचा आजार कमी न झाल्यास अथवा अतिसाराचे प्रमाण आढळल्यास पालकांनी त्वरित जवळच्या महापालिका आरोग्य केंद्र, दवाखाना, रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

अशा प्रकारे होत आहेत उपाययोजना

– अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंकचे महत्त्व, स्तनपान सुरू ठेवणे, अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचालयाचा वापर या विषयीची माहिती देण्यात येत आहे.

– सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये योग्य प्रकारे हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत असून हात धुण्याच्या टप्प्यांविषयीचे पोस्टर्स प्रत्येक आरोग्य संस्था व शाळांमध्ये हात धुण्याच्या ठिकाणी लावण्यात येत आहेत.

– प्रत्येक आरोग्य केंद्र, दवाखाना आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ओआरएस आणि झिंक कॉर्नरची स्थापना करण्यात येत आहे.