
सामना ऑनलाईन । मुंबई
‘असर’ या शैक्षणिक अहवालात यंदा राज्याचा शिक्षण विभाग पास झाला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत खासगी शाळांपेक्षा राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम असून वाचन आणि गणितीय क्षमतांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची प्रगती झाल्याचे ‘असर’मध्ये म्हटले आहे. मात्र आजही शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवाच असून मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छालयाचा प्रश्न सुटलेला नाही.
ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत राज्याचा ‘असर’ अहवाल मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. प्रथम संस्थेच्या पुढाकाराने राज्यातील 33 जिह्यांमधील 990 गावांमधील 19 हजार 65 घरांमध्ये सर्व्हे करण्यात आला. यात 3 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश होता. या अहवालानुसार खासगी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे प्रमाण 2006 मधील 18.3 टक्क्यांवरून 2018 मध्ये 37.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तसेच 6 ते 14 वयोगटातील मुलांची पटनोंदणी उत्तम आहे.
प्राथमिक शाळांमधील मुलांची प्रगती उच्च प्राथमिक शाळांतील मुलांपेक्षा चांगली झाली असून वाचन स्तर विभागातही प्रगती उंचावली आहे. जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता दुसरीच्या स्तराचा मजकूर वाचू शकणाऱ्या इयत्ता तिसरीच्या मुलांचे प्रमाण खासगी शाळांपेक्षा 10.6 टक्क्यांनी जास्त आहे.
- पटनोंदणीची टक्केवारी 98.5 वरून 99.2 आहे.
- प्राथमिक शाळांतील मुलांची प्रगती उच्च प्राथमिक शाळांतील मुलांपेक्षा जास्त आहे.
- देशाच्या तुलनेत महाराष्ट्राची प्रगती उत्तम आहे.
- गणितात तिसरी, पाचवी आणि आठवीच्या मुलांची प्रगती चांगली दिसून येते.
- जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांची व शिक्षकांची अधिक उपस्थिती.
महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत वाचन आणि गणितात प्रगती केली आहे. मात्र अजून सुधारणेला वाव आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम उत्तम रीतीने राबविल्याचा हा परिणाम आहे. शिक्षण विभागाने राबविलेले वाचन प्रेरणा दिन, चाचण्या, शिक्षणवारी हे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले आहेत.
विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री


























































