‘ट्रायमॅक्स’च्या घोळामुळे पालिकेच्या 12 हजार विद्यार्थ्यांना तिकिटाचा भुर्दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘बेस्ट’ बसमध्ये तिकीट देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ट्रायमॅक्स’ मशीनच्या घोळामुळे तब्बल 12 हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना तिकिटाचा भुर्दंड पडत आहे. सध्या ‘बेस्ट’कडे विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी पर्यायी सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्यामुळे पास देता येत नसल्याचे पालिका प्रशासनाने बुधवारी शिक्षण समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात शिवसेनेने संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी तातडीने व्यवस्था करा अशी मागणी केली.

शिवसेनेने मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पालिका शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची योजना राबवली जात आहे. यानुसार मोफत ‘बेस्ट’ पाससाठी सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामधील 13 हजार विद्यार्थ्यांना मोफत पास वितरित करण्यात आले, मात्र अजूनही 12 हजार विद्यार्थ्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. या पाससाठी विद्यार्थी-पालक शाळा आणि ‘बेस्ट’ प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत शिवसेनेचे साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनाने विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा अशी मागणीही त्यांनी केली.

तातडीने व्यवस्था करा
‘बेस्ट’मध्ये सध्या फक्त वडाळा आणि बॅकबे आगारातच थोड्या प्रमाणात ‘ट्रायमॅक्स’चा वापर सुरू आहे, मात्र बाकी मुंबईभरात ट्रायमॅक्सचा वापर बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या पासचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न निर्माण झाला असताना ‘बेस्ट’ अथवा पालिका प्रशासनाने अद्याप पर्याय का उपलब्ध केला नाही, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी उपायुक्त मिलीन सावंत यांनीदेखील पास देण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करा असे निर्देश प्रशासनाला दिले.