मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक धूळ-कचरामुक्त! महत्त्वाच्या ठिकाणांची साफसफाई रात्री करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा ‘मॉर्निंग वॉक’ आता धूळमुक्त आणि स्वच्छ वातावणात होणार आहे. कारण पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या ‘वॉकिंग ट्रक’सह महत्त्वाच्या मैदानांची साफसफाई रात्रीच्या वेळी केली जाणार आहे. घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी ही माहिती दिली.

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे बहुतांशी नागरिक सकाळी किंवा सायंकाळी काही वेळ मैदानांमध्ये फेरफटका मारायला जातात. यामध्ये सकाळच्या वेळी घराबाहेर पडणाऱयाना धूळ आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. कारण पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सकाळपासूनच स्वच्छतेचे काम सुरू केले जाते. त्यामुळे सकाळच्या स्वच्छ आणि मोकळ्या हवेचा फायदा घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना धूळ आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मरीन ड्राइव्ह अशा मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी तर हजारो नागरिक ‘मॉर्निंग वॉक’साठी येत असतात. या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मॉर्निंग वॉकसाठी वापरल्या जाणाऱया महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता रात्रीच्या वेळी करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत कचऱयाचे प्रमाण घटले

पालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱयाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱया इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱयाच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शिवाय कचरा व्यवस्थापन करणाऱया सोसायटय़ांना मालमत्ता करात 10 टक्क्यांपर्यंत सूटही देण्यात येते. त्यामुळे दोन-अडीच वर्षांपूर्वीचे मुंबईत दररोजचे 7 ते साडेसात हजार मेट्रिक टनांपर्यंत असणारे कचऱयाचे प्रमाण आता 6500 मेट्रिक टनांवर आले आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.